औरंगाबाद: जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून गायब असलेलया पाऊसाने आज अखेर हजेरी लावली. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सर्वत्र वातावरणात गारवा निर्माण झाला.
आज सकाळी शहरात लख्ख सूर्यप्रकाश होता. त्यामुळे दरवेळीप्रमाणे आताही हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरतो कि काय अशी परिस्थिती होती. दिवसभर नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण होते. मात्र, दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. ढगाळ वातावरण पाहता नागरिकांना पाऊस पडण्याची अपेक्षा होती. अखेर ४ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, हा पाऊस फार जास्त काळ टिकला नाही. त्यामुळे नागरीकांची निराशा झाली. किमान पावसाने हजेरी तरी लावली यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या पावसामुळे शेतकरी वर्गामध्येदेखील आनंदाचे वातावरण असून झालेला पाऊस पिकांसाठी पुरेसा नसला तरी तो लवकरच कोसळेल व धरतीची कुस भरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यातील गंगापूर, फुलांब्रीसह औरंगाबाद तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाची अधिकृत आकडेवारी अद्याप पर्यंत हाती आलेली नाही.